
नाशिक, 15 मे, (हिं.स.)। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रिंग रोड संदर्भात शेतकऱ्यांची चोरून व लबाड पद्धतीने पाहणी करून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमीकेविरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने “जाब विचारो आंदोलन” करण्यात आले. जिल्हाधिकारी त्र्यंबकेश्वर येथे बैठकीसाठी गेले असल्यामुळे त्यांच्याशी फोन व संदेशाद्वारे चर्चा करून त्यांच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
शेतकरी कायम एकसंघ आणि समविचारी राहिलेले आहेत. मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अकार्यक्षम जिल्हाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहेत. पूर्वी झालेल्या बैठकीत शांततेत चर्चेच्या माध्यमातून बाह्य रिंग रोडचा प्रश्न सोडविण्याचे ठरले आहेत. परंतू त्यांनी कोणालाही पूर्वकल्पना किंवा वेळेची माहिती न देता सकाळी ७ वाजता मातोरी व मुंगसारे गावांमध्ये अचानक भेट देत पाहणी दौऱ्याचा केवळ देखावा करण्याचा प्रयत्न केला. सकारात्मक चर्चा होऊन मार्ग निघत असताना जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे गायकर यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी त्या ठिकाणी नेमके पाहणीसाठी गेले होते की मॉर्निंग वॉकसाठी? असा उपरोधिक सवालही करण्यात आला. गायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन व संदेशाद्वारे जाब विचारल्यानंतर त्यांनी फक्त “आपण चर्चा करू, मी निर्णय घेतो” असे तोंडी आश्वासन दिले. मात्र आंदोलनाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी संबंधित शेतकऱ्यांच्या घर व विहिरी वाचविण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले नाही, तर सोमवारपासून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा थेट इशारा करण गायकर यांनी शासनाला दिला आहे. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या या निर्णायक आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार, दिनांक १७ मे रोजी सकाळी ९ वाजता विल्होळी गाव येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शेतकरी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व शेतकरी संघटना व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड अन्यायग्रस्त बाधित मातोरी, मुंगसारे, चांदशी, जलालपूर आणि गोवर्धन येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवावा. अन्यथा संघर्ष अटळ असून यात शेतकरी विजय मिळवतीलच. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी शासन प्रशासन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जबाबदार असतील. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दत्तामामा भरणे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
करण गायकर , संस्थापक अध्यक्ष , छावा क्रांतीवीर सेना
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV