
लातूर, 15 मे (हिं.स.) ; अहमदपूर तालुक्यातील अंधोरी जिल्हा परिषद गटांतर्गत थोडगा पंचायत समिती क्षेत्रात अवैध दारूविक्री आणि संबंधित गैरप्रकार वाढल्याचा आरोप करत स्थानिक महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्या डॉ. अंजलीताई गौड यांनी पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
परिसरातील अनेक गावांमध्ये देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा वावर, रात्रीच्या वेळी गोंधळ, आरडाओरडा आणि हैदोस यामुळे महिलांसाठी परिसर असुरक्षित झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या त्रासाला कंटाळून परिसरातील महिलांनी डॉ. अंजलीताई गौड यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर त्यांनी डॉ. रामेश्वर गौड यांच्यासह अहमदपूर पोलीस ठाणे गाठून उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांची भेट घेतली.
या भेटीत थोडगा परिसरातील अवैध दारूविक्री तात्काळ थांबवावी आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पोलीस ठाण्याला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि अवैध धंद्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक महिला आणि डॉ. अंजलीताई गौड यांनी स्वागत करत आभार मानले असून या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांवर आळा बसेल आणि सुरक्षिततेची भावना वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis