नेरळ परिसरात चेन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला; अल्पवयीन आरोपी फरार
रायगड, 19 मे (हिं.स.) : नेरळ परिसरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला
Attempt to snatch woman's mangalsutra in Neral; Theft foiled due to circumspection


रायगड, 19 मे (हिं.स.) : नेरळ परिसरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून आरोपी अल्पवयीन मुलगा घटनास्थळावरून पळून गेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे नेरळ खांडा, व्ही.वाय. कोठारी परिसरात घडली. फिर्यादी महिला आपल्या घरासमोर एका परिचित व्यक्तीसोबत उभ्या राहून संवाद साधत होत्या. त्याचवेळी एक विधीसंघर्षित बालक हळूहळू त्यांच्या दिशेने आला. सुरुवातीला संशय न आल्याने महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र अचानक आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिलेने तत्काळ सावध होत मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे आरोपीला मंगळसूत्र हिसकावून नेण्यात अपयश आले. चोरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच तो घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 107/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 304(2), 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करीत आहेत.

दरम्यान, वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande