येवला वन विभागात एसीबीची धडक कारवाई; 8 जण ताब्यात
येवला, 19 मे (हिं.स.) : येवला वन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी मोठी धडक कारवाई करत वृक्षतोड परवानगीच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी वन विभागातील तब्बल आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात तसेच शासकीय वर्तुळा
एफआईआर लोगो


येवला, 19 मे (हिं.स.) : येवला वन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी मोठी धडक कारवाई करत वृक्षतोड परवानगीच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी वन विभागातील तब्बल आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात तसेच शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील एका तक्रारदाराने आपल्या हद्दीतील वृक्षतोडीसाठी वन विभागाकडे नियमानुसार परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत याबाबत थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी येवला वन विभाग कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान संशयित असलेल्या वन विभागातील आठ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

शासकीय विश्रामगृहात चौकशी सुरू

कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना पुढील चौकशीसाठी येवला येथील शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले आहे. संबंधितांनी किती रकमेची लाच मागितली होती आणि किती रक्कम स्वीकारली, याबाबत एसीबीकडून सखोल चौकशी सुरू आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयितांची चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असून रात्री उशिरापर्यंत येवला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वन विभागातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई होण्याची येवल्यातील ही पहिलीच मोठी घटना मानली जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande