भाजपचे आंदोलन म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' - किरण जाधव
लातूर, 19 मे, (हिं.स.)। केंद्रात आणि राज्यात स्वतःची पूर्ण बहुमताची सत्ता असताना, गेल्या १०-१२ वर्षांत देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भाजपने आज लातुरात काँग्रेस भवनसमोर आं
राष्ट्रीय काँग्रेस


लातूर, 19 मे, (हिं.स.)। केंद्रात आणि राज्यात स्वतःची पूर्ण बहुमताची सत्ता असताना, गेल्या १०-१२ वर्षांत देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भाजपने आज लातुरात काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न म्हणजे निव्वळ 'चोराच्या उलट्या बोंबा' आहेत, अशी घणाघाती टीका लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केली आहे. भाजपच्या या 'नौटंकी' आंदोलनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

भाजपने आज 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लातूर येथील काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या राजकीय आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना काँग्रेस शहराध्यक्ष किरण जाधव यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला.

स्वतःचे पाप लपवण्यासाठी भाजपची रस्त्यावर नौटंकी!

ॲड. किरण जाधव पुढे म्हणाले की, NEET परीक्षा असो की इतर कोणत्याही केंद्रीय परीक्षा, या सर्व परीक्षांचे नियोजन, सुरक्षा आणि नियंत्रण थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. संपूर्ण देशात पेपरफुटीचे रॅकेट उघड होत असताना आणि केंद्रीय यंत्रणा अपयशी ठरलेली असताना, मूळ आरोपींना आणि शिक्षण क्षेत्रातील माफियांचे 'वरदहस्त' शोधून काढण्याऐवजी भाजप स्वतःच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची नौटंकी करत आहे. स्वतःचे पाप लपवण्यासाठी आणि अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे बोटे दाखवण्याचा हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे.

भाजप आमदारांचे क्लासेसमध्ये हितसंबंध; लातूर पॅटर्नला बदनाम करण्याचे षड्यंत्र!

भाजपाचे नीट विद्यार्थ्यांवरील प्रेम म्हणजे 'पुतणा मावशीचे' प्रेम आहे. भाजप आमदारांचे खाजगी क्लासेसमध्ये काय हितसंबंध आहेत, हे लातूरची जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. लातूरच्या शैक्षणिक वारशावर बोलताना जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लातूरने आपल्या कठोर परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात संपूर्ण देशात एक वेगळा नावलौकिक मिळवला आहे. मात्र, भाजप आणि त्यांच्याशी संबंधित हितसंबंधी लोक जाणीवपूर्वक लातूरच्या या पवित्र शिक्षण पॅटर्नला आणि इथल्या काँग्रेसच्या राजकीय नेतृत्वाला बदनाम करण्याचे पद्धतशीर षड्यंत्र रचत आहेत. पण लातूरची सुजाण जनता भाजपचा हा कुटील डाव ओळखून आहे, असे ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जाब विचारणे हा लोकशाहीतील विनोद!

गेल्या काही वर्षांत देशात केंद्रीय परीक्षांच्या पेपरफुटीची मालिकाच सुरू आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत कडक कारवाई करून दोषींना तुरुंगात टाकण्याऐवजी, सत्ताधारी भाजप रस्त्यावर उतरून उलट विरोधी पक्षाला जाब विचारत आहे, हा लोकशाहीतील सर्वात मोठा विनोद आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जाब विचारण्याऐवजी देशातील कोट्यवधी हतबल विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उत्तर द्यावे, असा सवाल ॲड. जाधव यांनी उपस्थित केला.

भाजपाचा बुरखा फाडणार: काँग्रेसचा इशारा

काँग्रेस पक्ष हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुढेही राहील. भाजपच्या असल्या दबावाच्या आणि नौटंकी राजकारणाला आम्ही अजिबात घाबरणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजपचा बुरखा आम्ही लातूरकरांसमोर आणि देशासमोर पूर्णपणे फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ॲड. किरण जाधव यांनी शेवटी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande