‘थांबण्याची कला आत्मसात केल्यास आयुष्य समृद्ध होते’ — डॉ. संजय मालपाणी
नाशिक, 19 मे (हिं.स.) : “विजय मिळवायचा असेल तर कुठेतरी थांबता आलं पाहिजे. हे थांबणे म्हणजे विवेकपूर्ण जागृती असून, आजच्या स्पर्धेच्या युगात ही कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्
One-should-be-able-to-


नाशिक, 19 मे (हिं.स.) : “विजय मिळवायचा असेल तर कुठेतरी थांबता आलं पाहिजे. हे थांबणे म्हणजे विवेकपूर्ण जागृती असून, आजच्या स्पर्धेच्या युगात ही कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या 103 वर्षांच्या परंपरेत सोमवारी आयोजित स्व. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानात ते ‘थांबण्याची कला’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमात सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे विश्वस्त संदीप पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. दौलतराव आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर सुरेश केला यांनी स्वागत केले.

“क्रियेपूर्वी नव्हे, प्रतिक्रियेपूर्वी थांबा”

डॉ. मालपाणी म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस क्रियेच्या आधीच प्रतिक्रिया देतो. मात्र, त्या मधल्या क्षणी थांबून विचार करण्याची क्षमता विकसित झाली तर यशाचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. “थांबणे ही कमजोरी नसून ती एक विचारपूर्वक कृती आहे,” असे त्यांनी सांगितले.

भगवान गौतम बुद्ध आणि अंगुलीमाळ यांच्या कथेद्वारे त्यांनी ‘योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी थांबण्याचे महत्त्व’ स्पष्ट केले. तसेच भगवद्गीतेतील कृष्णनीती, अर्जुनाचे संभ्रमित होणे, युद्धभूमीवरील प्रसंग आणि शंखनाद यांचा दाखला देत त्यांनी जीवनातील विवेकाचे महत्त्व अधोरेखित केले.

नीट परीक्षा, पेपरफुटी आणि कौटुंबिक विसंवादावर भाष्य

आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी नीट परीक्षा, पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील ताण, पालकांच्या अपेक्षा आणि घराघरातील वाढता विसंवाद यांचा उल्लेख केला. शरीरासोबतच भावनांनाही थांबवून विवेक निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“स्मित हास्य हा एक प्रभावी उपचार आहे. क्रियेनंतर दिलेली विवेकपूर्ण प्रतिक्रिया म्हणजेच थांबण्याची कला,” असे सांगत सहा इंद्रियांचे संयमन साधल्यास आयुष्य समृद्ध होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित चित्रप्रदर्शनात वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांनी सादर केलेल्या चित्रकृतींनाही रसिकांची मोठी दाद मिळाली. पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande