
लातूर, 19 मे (हिं.स.) : नीट पेपर फुटीप्रकरणी आरोपी ठरलेल्या RCC क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने लातूरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंडाफेक करत जोरदार घोषणाबाजी केली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नीट पेपर फुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत RCC क्लासमधील हजारो विद्यार्थ्यांची फी तात्काळ परत करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
“विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त करणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये. अन्यथा मनसे राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनावेळी मनविसे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण, मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, रेनापूर नगरपंचायत नगरसेवक वाहेदभाई शेख, लातूर शहर संघटक बजरंग ठाकूर, अनिल जाधव, जहांगीर शेख, सय्यद सरफराज, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इंद्रजीत माने, गफ्फार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis