
चंद्रपूर, 19 मे (हिं.स.) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत महिला बचतगटांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘नवतेजस्विनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’च्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काढोळे, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, कौशल्य विकास विभागाच्या अनिसा तडवी, महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आणि प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे उपस्थित होते.
महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ
जिल्हाधिकारी पंत यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये माविममार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने बचतगटातील महिलांनी सुरू केलेल्या कार्पेट निर्मिती, बांबू वस्तू निर्मिती आणि अगरबत्ती प्रकल्पांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद’ आणि ‘माविम’ यांच्या संयुक्त विद्यमाने विक्री केंद्र उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच ‘उमेद’च्या धर्तीवर माविमच्या बचतगटांना फिरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन विभागाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीचे त्रैमासिक आयोजन करण्याच्याही सूचना यावेळी करण्यात आल्या.
2026-27 मध्ये नवीन उपप्रकल्प राबविणार
वर्ष 2026-27 दरम्यान मशरूम कल्टीवेशन, शेवगा उत्पादक क्लस्टर आणि कोठार निर्मिती यांसारखे उपप्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समिती, खनिज क्षेत्र विकास निधी आणि इतर विभागांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी पंत यांनी विविध विभागांनी माविमच्या बचतगटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
42 उपप्रकल्पांतून 7,755 महिलांना रोजगार
जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काढोळे यांनी जिल्ह्यातील बचतगट महिलांसाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सध्या 42 उपप्रकल्प सुरू असून त्यामधून एकूण 7,755 महिलांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव