
-रोहित आणि कोहलीचा समावेश, ईशान किशनचे ३ वर्षांनंतर पुनरागमन -जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला विश्रांती
गुवाहाटी, 19 मे (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुरुष निवड समितीची मंगळवारी गुवाहाटी येथे बैठक झाली, त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील खेळणार आहेत. आयपीएल २०२६ संपल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ही मालिका खेळवली जाईल. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, त्यामुळे विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल.
प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार यांचा भारतीय एकदिवसीय संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. तथापि, या मालिकेत त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. रोहित शर्माचाही संघात समावेश आहे, परंतु मालिकेतील त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, रोहित आणि हार्दिक दोघेही एकदिवसीय संघात आहेत, पण त्यांचा सहभाग तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून असेल. अपेक्षेप्रमाणे, जसप्रीत बुमराहला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तसेच तो कसोटी संघातही नाही.
विशेष म्हणजे, भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. पत्रकार परिषदेदरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले की, जडेजाला वगळण्यात आलेले नाही, तर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. संघ गिलच्या नेतृत्वाखाली खेळेल, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये केएल राहुल आणि इशान किशन यांचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. टी-२० सामन्यांनंतर इशानने भारतीय एकदिवसीय संघात यशस्वी पुनरागमन केले आहे. पण, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला संधी देण्यात आलेली नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विराट कोहलीची निवड झाल्याने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. कोहली सध्या आयपीएल २०२६ मध्ये सहभागी असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, अफगाणिस्तानविरुद्धही तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. जर रोहितही तंदुरुस्त असेल, तर रोहित-कोहली ही जोडी मायदेशात पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसणार आहे.भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका १४ जून रोजी धरमशाला येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल. पुढील दोन सामने अनुक्रमे १७ आणि २० जून रोजी लखनऊ आणि चेन्नई येथे खेळले जातील.एकदिवसीय मालिकेपूर्वी ६ जून रोजी मुल्लानपूर येथे एकच कसोटी सामना खेळला जाईल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे