फार्मसी धोरणाविरोधात अहमदपूर तालुक्यात मेडिकल दुकाने कडकडीत बंद
- रुग्ण आणि नागरिकांची मोठी गैरसोय लातूर, 20 मे (हिं.स.)। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अहमदपूर तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएश
बंद


- रुग्ण आणि नागरिकांची मोठी गैरसोय

लातूर, 20 मे (हिं.स.)।

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अहमदपूर तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने या बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून, केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री आणि ई-फार्मसी धोरणांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज सकाळपासूनच अहमदपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश औषध दुकाने बंद दिसून आली. या अचानक झालेल्या बंदमुळे रुग्ण आणि सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून, विशेषतः नियमित औषधे घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन गरज असलेल्या नागरिकांना औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक मेडिकल दुकानांबाहेर येऊन चौकशी करताना आणि औषधांभावी अडचणींचा सामना करताना दिसून आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने औषध विक्रेत्यांच्या रास्त मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, बंदच्या काळात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनकडूनही तालुक्यातील नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बंदबाबत बोलताना स्थानिक मेडिकल व्यावसायिक अमोल कानगुले यांनी सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्रामीण भागातील छोट्या मेडिकल व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. शासनाने आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन यावर योग्य तो निर्णय घ्यावा. हा बंद वैयक्तिक कोणाच्या विरोधात नसून, पारंपरिक मेडिकल व्यवसाय टिकवण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande