गुन्हेगारांना न्यायालयाचा दणका; दोन मारहाण प्रकरणांतील सहा आरोपींना शिक्षा
लातूर, 20 मे (हिं.स.) : कासार शिरशी पोलीस ठाण्याने तपास केलेल्या दोन स्वतंत्र मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी प्रकरणांमध्ये निलंगा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने एकूण सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. न्यायाधीश गुंजवटे यां
न्यायालय


लातूर, 20 मे (हिं.स.) : कासार शिरशी पोलीस ठाण्याने तपास केलेल्या दोन स्वतंत्र मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी प्रकरणांमध्ये निलंगा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने एकूण सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. न्यायाधीश गुंजवटे यांच्या न्यायालयात या दोन्ही प्रकरणांची सुनावणी झाली.

पहिल्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक 151/2019 अन्वये भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मेघा जनार्धन फुले, रा. बोळेगाव, ता. निलंगा या घरी असताना बांधाच्या कारणावरून आरोपींनी वाद घालत मारहाण केली होती. आरोपी जयाबाई जयवंत फुले यांनी फिर्यादीस चावा घेऊन जखमी केले, तर लक्ष्मण जयवंत फुले यांनी काठीने मारहाण केली होती. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या प्रकरणात आरोपी जयाबाई जयवंत फुले, लक्ष्मण जयवंत फुले आणि सोनाली लक्ष्मण फुले यांना न्यायालयाने दोषी ठरवत भादंवि कलम 324 अंतर्गत प्रत्येकी दोन महिने साधी कैद व तीन हजार रुपये दंड, कलम 323 अंतर्गत प्रत्येकी दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड तसेच कलम 504 अंतर्गत प्रत्येकी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक 168/2016 अन्वये भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आतिक युसुफ कालचीवे हे शेताकडे जात असताना आरोपी मोटारसायकलवरून येऊन जागेच्या व्यवहाराबाबत तक्रार का केली, या कारणावरून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवरील टिकाव काढून त्याच्या तुंब्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या प्रकरणात आरोपी मोहसीन बब्रू कालचीवे, सत्तार मैनुद्दीन कालचीवे आणि रुकूम चांद कालचीवे यांना दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम 324 अंतर्गत प्रत्येकी सहा महिने साधी कैद व तीन हजार रुपये दंड, कलम 323 अंतर्गत प्रत्येकी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड तसेच कलम 504 अंतर्गत प्रत्येकी सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अंमलदार प्रदीप जाधव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने पूर्ण केला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळ पंचनामे व तांत्रिक बाबींच्या आधारे न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील व्ही. एन. म्हेत्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट अंमलदार व पैरवी अंमलदार एन. एन. बेडदे, समीर कोरबू आणि विकास मुगळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक गुन्ह्याचा निष्पक्ष व पुराव्यावर आधारित तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande