लातूरमध्ये औषधी विक्रेत्यांचा बंद यशस्वी
लातूर, 20 मे (हिं.स.)। अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला बुधवारी लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी आपापली औषधी दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी केला. लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळी सा
औषधी विक्रेते संप


लातूर, 20 मे (हिं.स.)। अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला बुधवारी लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी आपापली औषधी दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी केला. लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले.ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला.

औषध विक्री व्यवसाय हा औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमांतर्गत चालवला जातो. मात्र ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात अधिनियमात कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना देशभरात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप औषधी विक्रेत्यांनी केला आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती दिल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

कोरोना काळात सरकारने औषधांच्या होम डिलिव्हरीला विशेष परवानगी दिली होती. मात्र कोरोना संपल्यानंतरही ती अधिसूचना कायम असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात येत असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनने जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पर्यायी व्यवस्था उभी केली होती.

अत्यावश्यक औषधांसाठी संबंधित पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले होते.

लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव अरुण सोमाणी, उपाध्यक्ष ओमप्रकाश बाहेती, अनिल स्वामी, धनंजय जोशी, सत्यवान सूर्यवंशी, रामकुमार सोनटक्के, प्रकाश साखरे, ईश्वरचंद्र बाहेती, अंकुश भोसले, संगमेश्वर नीला, अतुल कोटलवार, रमेश भांगडिया, नागेश स्वामी, सौ. दीपाली निनगुरकर, जयप्रकाश रेड्डी, बालाजी थेटे, रमाकांत भुरकापल्ले आदींनी सर्वांचे आभार मानले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande