रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यंदाचा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे संपूर्ण जि
रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा


रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदाचा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आवश्यक मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहेत. रोहिणी नक्षत्र सव्वीस मेपासून सुरू होत असून या हंगामात धूळवाफेच्या पेरण्या केल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे वेगाने उरकण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीसाठी एकूण १२ हजार ५०० टन खताची मागणी कृषी विभागाकडे नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ७०० टन खत आतापर्यंत प्रत्यक्ष उपलब्ध झाले असून, त्यामध्ये २ हजार टन युरिया तर ७०० टन सुफला खताचा प्रामुख्याने समावेश आहे.

खतपुरवठा साखळीबाबत निर्माण झालेल्या विविध चर्चांमुळे शेतकऱ्यांचा ताण वाढला असून ते खतांची मागणी नोंदवण्यासाठी घाई करत आहेत, मात्र प्रशासनाने खतपुरवठा पूर्णपणे सुरळित असल्याची ग्वाही दिली आहे.

रासायनिक खतांच्या संभाव्य तुटवड्याची भीती आणि आखाती प्रदेशातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील काही आंबा व काजू बागायतदारांनी सेंद्रिय खतांचा पर्याय निवडला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात, नागली आणि भाजीपाला यांसारखी महत्त्वाची पिके घेतली जात असली, तरी बागायतदारांकडून जून व जुलै महिन्यात झाडांना मोठ्या प्रमाणावर खते घातली जातात. पिकांच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादकतेसाठी मिश्र खते पुरेशी उपलब्ध असावीत, यासाठी सेंद्रिय खतांना मागणी कमालीची वाढली आहे. शेतकरी आता खासगी कंपन्यांकडून मासळी आणि लिंबापासून तयार केलेले सेंद्रिय खत तसेच शेणखत, कंपोस्ट व गांडूळ खत खरेदी करण्याला मोठी पसंती देत आहेत.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे रासायनिक खतांच्या आयातीवर आणि उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी जिल्हा कृषी विभाग उर्वरित खते येत्या काही दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande