
ट्रकमध्ये बनावट नंबर प्लेट्स आढळल्या
नाशिक, 21 मे (हिं.स.) : येवला परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे गो-तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून कत्तलीच्या उद्देशाने नेल्या जात असलेल्या २० गाईंची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणात एक आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून त्यामध्ये बनावट नंबर प्लेट्स आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून मालेगावच्या दिशेने हा ट्रक गाईंना घेऊन जात असल्याची माहिती येवला परिसरातील गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ ट्रकचा पाठलाग करून त्याला थांबवले आणि ‘११२’ हेल्पलाइनद्वारे पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व २० गाईंची सुटका केली. या गाईंना नंतर सुरक्षितपणे येवला पांजरपोळ येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान, ट्रकची तपासणी केली असता विविध क्रमांकांच्या अनेक बनावट नंबर प्लेट्स आढळून आल्या. या प्रकारामुळे या घटनेमागे मोठे तस्करी रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.येवला शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून ट्रकचा मूळ मालक आणि संबंधित जाळे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV