
रत्नागिरी, 21 मे (हिं.स.) । विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता महिला यांचे सर्वेक्षण करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदने केले आहे. परंतु रत्नागिरी शहरात मात्र हे सर्वेक्षण झाले नसल्याचे चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांचे म्हणणे आहे. हे सर्वेक्षण तत्काळ करून त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर केले आहे. शहरातील अशा महिलांची संख्या मोठी असल्याने या महिलांना रोजगाराची नितांत गरज आहे. यासाठी अशा महिलांचे सर्वेक्षण व्हावे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामार्फत या एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे या संस्थेचे म्हणणे आहे.
या सर्व एकल महिलांचा बचत गटात समावेश करण्याची सूत्रे हलली पाहिजेत. रोजगार निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले पाहिजे. या कार्यशाळेत बचतगट, कौशल्य विकास, उद्योग या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन या एकल महिलांना करावे, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
निर्माण केलेल्या उत्पादनाला विक्रीसाठी जागा, दुकाने उभारण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. २९ मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार ५ टक्के रक्कम महिला बालकल्याणासाठी खर्च केली जाते. त्यातील काही रक्कम या एकल महिलांच्या मुलांचे शिक्षण व आवश्यक बाबींसाठी खर्च करणे आवश्यक आहे.
शहरातील या एकल महिलांची एकत्रित सभा पालिका सभागृहात चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी, या सभेत रोजगार प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे,अशी विनंती चक्रभेदी सोशल फाउंडेशनने केली आहे.
सुधारित आराखड्यात या दुर्बल घटकांचा विचार व्हावा, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. ग्रामपंचायत स्तरावर जसे सर्वेक्षण सुरू आहे त्याच धर्तीवर शहरी भागात या एकल महिलांचे सर्वेक्षण व्हावे, या आशयाचे निवेदन चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, देवरूख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, जिल्हा मुख्याधिकारी भोसले यांना देण्यात आले.
रत्नागिरी पालिकेचे प्र. सहआयुक्त (नपाप्र) वैभव गारवे यांना निवेदन देण्यासाठी संस्थेच्या दीपाली गावडे, सुनंदा सणस व वैदेही सावंत उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी