
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ गुणवंत विद्यार्थ्यांची ‘मिशन गगनभरारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत बंगळुरू येथील इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी बंगळुरूकडे रवाना झाले.
पाच दिवसांच्या दौऱ्यात हे विद्यार्थी इस्रोच्या विविध विभागांना भेट देत रॉकेट, उपग्रह, अवकाश संशोधन आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राची ओळख व्हावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि भविष्यातील वैज्ञानिक घडावेत, या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘मिशन गगनभरारी’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील पाचवी ते सातवीच्या २२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर ही निवड प्रक्रिया पार पडली.
अत्यंत कडक आणि स्पर्धात्मक परीक्षेतून अंतिमतः १७ विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत इस्रो दौऱ्यासाठी स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ११ अधिकारी आणि शिक्षकांचे विशेष पथक त्यांच्यासोबत रवाना झाले आहे. विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, प्रवास तसेच अभ्यासदौऱ्याचे संपूर्ण नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
......
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी