सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात क्रीडा फिजिओथेरपी शिबिर; जवानांच्या कार्यक्षमतेवर भर
लातूर, 22 मे (हिं.स.) : संरक्षण दलातील जवानांना कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणातून जावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रीडा फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन महाराष
शिबिर


लातूर, 22 मे (हिं.स.) : संरक्षण दलातील जवानांना कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणातून जावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रीडा फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे क्रीडा फिजिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. विजय त्रिपाठी यांनी केले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र, लातूर येथे क्रीडा फिजिओथेरपी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड आणि प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या कार्यक्रमास सीआरपीएफचे उप महानिरीक्षक ए. एच. अन्सारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत राय, सहयोगी प्रा. डॉ. मेघा बक्षी तसेच प्रशासकीय अधिकारी सत्यवान झरे उपस्थित होते.

डॉ. विजय त्रिपाठी यांनी सैनिकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेत धावणे, वजन प्रशिक्षण, अडथळा शर्यती, पोहणे, पर्वतारोहण, युद्ध प्रशिक्षण आणि शस्त्र हाताळणी यामुळे शरीरावर मोठा ताण येतो, असे सांगितले. यामुळे स्नायू ताण, लिगामेंट दुखापती, गुडघेदुखी, पाठदुखी आणि स्ट्रेस फ्रॅक्चर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

दुखापतीनंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेत व्यायाम उपचार, मॅन्युअल थेरपी, इलेक्ट्रोथेरपी, टेपिंग तंत्र आणि वैज्ञानिक हालचाल विश्लेषण यांच्या मदतीने जवानांना अधिक सक्षम व सुरक्षित बनविता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहयोगी प्रा. डॉ. मेघा बक्षी यांनी योग्य वॉर्म-अप, कूल-डाउन, लवचिकता प्रशिक्षण, स्नायू बळकटीकरण, संतुलित आहार आणि वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धतीचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले.

शिबिरादरम्यान गतिशीलता, संतुलन, सहनशक्ती आणि कार्यात्मक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उच्च तीव्रतेचे प्रशिक्षण, योग, ध्यान आणि पुनर्प्राप्ती तंत्रांचा जवानांच्या कार्यक्षमतेवर होणारा सकारात्मक परिणामही यावेळी स्पष्ट करण्यात आला.

या शिबिरास सीआरपीएफचे प्रशिक्षणार्थी आणि सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande