
विष्णू भूतडा व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड
लातूर, 22 मे (हिं.स.) : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्यादित, लातूर यांच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत नुतन चेअरमन म्हणून अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर तर व्हाईस चेअरमन म्हणून विष्णू रामानुज भूतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम 2014 मधील तरतुदीनुसार ही निवडणूक प्रक्रिया संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एल. पोतंगले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी एस.एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अजित पाटील कव्हेकर यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष तसेच जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून विविध पदांवर कार्य करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्क व कार्यानुभवामुळे त्यांची चेअरमनपदी निवड झाली.
तर विष्णू भूतडा हे पतंजलि योग समिती महाराष्ट्र प्रभारी म्हणून कार्यरत असून पतंजलि मेगा स्टोअर्सच्या माध्यमातून त्यांचा मोठा व्यावसायिक व सामाजिक संपर्क आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली.
याच बैठकीत विविध प्रवर्गातून संचालकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वसाधारण प्रवर्गातून रंजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, मनोहर गोरटे, नितीन कोरे, अतुल माने, बाबासाहेब देशमुख, गोवर्धनदास भंडारी, प्राचार्य मारोती सूर्यवंशी आणि रोहित पाटील यांची निवड झाली. महिला प्रतिनिधी म्हणून अरुणा कांदे आणि रागिणी यादव, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून किशोर शिंदे, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून गणपत नागरगोजे आणि इतर मागास प्रवर्गातून बालाजी शेळके यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी बँकेचे प्र. कार्यकारी संचालक नितीन सराफ आणि जॉईंट एम.डी. किशनसिंह गहेरवार उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी बँकेने ग्राहक, व्यापारी व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत आगामी काळात बँकेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.
तर नवनिर्वाचित चेअरमन अजित पाटील कव्हेकर यांनी सर्वांच्या विश्वासास पात्र राहून बँकेची आर्थिक प्रगती साधण्यासोबतच “आदर्श बँक” निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis