
लातूर, 22 मे (हिं.स.) : आगामी ईद-उल-अजहा (बकरी ईद) सण शांततापूर्ण, सलोख्याच्या आणि कायद्याच्या चौकटीत साजरा व्हावा यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने व्यापक तयारी सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे विविध समाजघटक, धर्मगुरू, संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यामध्ये मुस्लिम समाजातील धर्मगुरू, हिंदूवादी संघटनांचे प्रतिनिधी, कुरेशी समाजाचे पदाधिकारी तसेच गोरक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बैठकीत गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. कायद्याचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा ठाम इशाराही प्रशासनाने दिला. संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने 20 मे ते 30 मे 2026 या कालावधीत जिल्हाभर विशेष बंदोबस्त लागू केला असून सात विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सतत गस्त घालून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
राज्य व जिल्हा सीमा तसेच संवेदनशील भागांमध्ये एकूण 22 ठिकाणी दिवसरात्र नाकाबंदी लावण्यात आली आहे. या माध्यमातून अवैध गोवंश वाहतूक आणि संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार आहे. मोटार परिवहन विभाग, पशुवैद्यकीय विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याशी समन्वय साधून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “लातूर जिल्ह्याला सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा लाभली आहे. सर्वांनी संयम राखून सण उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करावा.”
बैठकीच्या शेवटी सर्व समाजघटकांनी परस्पर सहकार्य, शांतता आणि कायद्याचे पालन राखून ईद-उल-अजहा सण सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे आश्वासन दिले.----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis