
गडचिरोली, २२ मे (हिं.स.) :गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण दारूबंदी असतानाही बनावट नंबर प्लेटचा वापर करून अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अहेरी पोलिसांनी संयुक्तपणे २१ मे रोजी आलापल्ली येथे सापळा रचून ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजा आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर एक व्यक्ती ‘बोलेरो कॅम्पर’ (MH 12 SX 6981) वाहनातून अवैध दारूची विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांना पाहताच आरोपी वाहन सोडून फरार झाला. मात्र, वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी व देशी दारूचा साठा आढळून आला.
मोठा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:
- हायवर्ड्स ५००० बिअर (१,१०४ कॅन) – अंदाजे ₹३,३१,२२०
- रॉकेट देशी दारू संत्रा (२,२०० निपा) – ₹१,७६,०००
- रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की (१२० बॅरल) – ₹४,८०,०००
- बोलेरो कॅम्पर चारचाकी वाहन – ₹५,००,०००
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १४,८७,२०० रुपये इतकी आहे.
तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वाहनावर बनावट नंबर प्लेट लावल्याचेही तपासात समोर आले आहे.
गुन्हा दाखल, आरोपी फरार
या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि अहेरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. पुढील तपास अहेरी पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond