
लातूर, 22 मे (हिं.स.) : पाण्याच्या बाटलीचे जास्त पैसे का घेता, असे विचारल्याच्या किरकोळ कारणावरून हॉटेल मालकासह ५ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणावर आणि त्याला सोडवण्यासाठी आलेल्या पुतण्यावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाली आहे. ही थरारक घटना अहमदपूर एम.आय.डी.सी. हगदळ पाटीजवळील 'हॉटेल नाईक' येथे घडली असून अहमदपूर पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत मुक्तीराम जाधव (वय २८, रा. भीमनगर, अहमदपूर) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास ते एम.आय.डी.सी. हगदळ पाटी येथील हॉटेल नाईक येथे पाणी घेण्यासाठी गेले होते. त्यांनी हॉटेल मालक अशोक जाधव याला पाण्याची बाटली मागितली असता त्याने ती ३० रुपयांना असल्याचे सांगितले. यावर अभिजीत यांनी पाण्याची बाटली तर १५ रुपयांना मिळते, १५ रुपये घ्या आणि बाटली द्या, असे म्हटले. या किरकोळ कारणावरून हॉटेल मालक चांगलाच भडकला. तू काय माझा मालक आहेस का? असे म्हणत त्याने अभिजीत यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
अभिजीत यांनी शिवीगाळीचा जाब विचारला असता, हॉटेल मालक अशोक सोपान जाधव याने जवळच असलेला लोखंडी रॉड त्यांच्या पाठीत मारला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने ऊस तोडण्याच्या कोयत्याने त्यांच्या डोक्यात उजव्या बाजूला गंभीर वार केला. या हल्ल्यात अभिजीत यांचे डोके फुटून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा हल्ला एवढा भयानक होता की त्यांच्या डोक्याला तब्बल ८ टाके पडले आहेत.
तितक्यात तिथे उपस्थित असलेल्या अन्य आरोपींनीही बेकायदेशीर जमाव जमवून अभिजीत यांच्यावर हल्ला चढवला. आरोपी श्रीकांत अशोक जाधव याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून रक्त काढले, तर पवन लहू जाधव याने लोखंडी रॉडने त्यांच्या पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली. यावेळी महिला आरोपी मीरा अशोक जाधव हिने अभिजीत यांचे हात घट्ट धरून ठेवत शिवीगाळ केली आणि सोपान शंकर जाधव याने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मुक्का मार दिला.
हा मारहाणीचा प्रकार पाहून अभिजीत यांचा पुतण्या गणेश राजू जाधव हा त्यांना सोडवण्यासाठी धावला. मात्र, आरोपी पवन लहू जाधव याने त्याच्यावरही कोयत्याने हल्ला करत डाव्या कानावर गंभीर वार केला. या वाराने गणेशच्या कानाला ७ टाके पडले आहेत. अखेर घटनास्थळी उपस्थित असलेले बालाजी कांबळे, बबन ढवळे, वाजीद काझी आणि संतोष राठोड यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले आणि जखमींचा जीव वाचवला. जाता जाता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या संतापजनक घटनेनंतर अभिजीत जाधव यांनी दिलेल्या जबाबावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात आरोपी अशोक सोपान जाधव, श्रीकांत अशोक जाधव, पवन लहू जाधव, मीरा अशोक जाधव आणि सोपान शंकर जाधव (सर्व रा. मरशीवणी, अहमदपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३४/२०२६ अन्वये BNS च्या कलम १०९, १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास राठोड करत आहेत. किरकोळ पैशांच्या वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे अहमदपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis