लातूर - निलंगा न्यायालयात सहा गुन्हेगारांना कोठडीची हवा
लातूर, 22 मे (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या तंत्रशुद्ध, निष्पक्ष आणि पुराव्यांवर आधारित तपासकार्यामुळे कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणांमधील एकूण सहा आरोपींना न्यायाल
निलंगा न्यायालय


लातूर, 22 मे (हिं.स.)।

लातूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या तंत्रशुद्ध, निष्पक्ष आणि पुराव्यांवर आधारित तपासकार्यामुळे कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणांमधील एकूण सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही स्वतंत्र प्रकरणांची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, निलंगा येथे मा. न्यायाधीश श्रीमती गुंजवटे यांच्या न्यायालयासमोर पार पडली. यावेळी दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी सादर केलेले सबळ साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, तपासातील सुसंगती आणि सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सामाजिक शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने दक्ष असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

यातील पहिल्या प्रकरणात, बोळेगाव (ता. निलंगा) येथील फिर्यादी मेघा जनार्धन फुले या २०१९ मध्ये आपल्या घरी असताना आरोपींनी बांधाच्या जुन्या कारणावरून वाद घालत संगनमताने त्यांच्या घरासमोरच मारहाण केली होती. यामध्ये आरोपी जयाबाई जयवंत फुले यांनी फिर्यादीला चावा घेऊन जखमी केले होते, तर आरोपी लक्ष्मण जयवंत फुले यांनी काठीने बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्याची संपूर्ण सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी जयाबाई जयवंत फुले, लक्ष्मण जयवंत फुले आणि सोनाली लक्ष्मण फुले या तिघांना दोषी ठरवले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना भादंवि कलम ३२४ अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व तीन हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड, तसेच कलम ५०४ अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसऱ्या प्रकरणात, २०१६ मध्ये फिर्यादी आतिक युसुफ कालचीवे हे आपल्या शेताकडे पायी जात असताना आरोपी मोटारसायकलवरून त्यांच्या पाठीमागून आले होते. जागेच्या व्यवहारासंदर्भात तक्रार का केली, या कारणावरून जुना राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवर आणलेला टिकाव काढून त्याच्या तुंब्याने फिर्यादीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपी मोहसीन बब्रू कालचीवे, सत्तार मैनुद्दीन कालचीवे आणि रुकूम चांद कालचीवे या तिघांना दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली. यात सर्व आरोपींना भादंवि कलम ३२४ अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, तसेच कलम ५०४ अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप जाधव तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर चव्हाण यांनी अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून पूर्ण केला होता. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या भक्कम दोषारोपपत्रामुळे (चार्जशीट) आरोपींना पळवाट मिळाली नाही. न्यायालयात सरकारी वकील श्री. व्ही. एन. म्हेत्रे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट व पैरवी अंमलदार एन. एन. बेडदे, समीर कोरबू आणि विकास मुगळे यांनी या दोन्ही प्रकरणांचा न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. लातूर पोलीस दलाच्या या प्रभावी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande