
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) |रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे मुंबईतील एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 21 मे) रात्री घडली.
सूरज राजाराम झोरे (वय 25, मूळ रा. नायरी, संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान साईनगर सात बंगल्याच्या मागील परिसरात सूरज झोरे याच्यावर तिघांनी मिळून कोयत्याने हल्ला केला. संशयितांनी त्याच्या मानेवर व हातांवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत सूरजला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सूरजची बहिण नंदा रमेश फाले (वय 32, रा. राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग, दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजिबूल शेख ऊर्फ सोनू या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांच्याही पत्त्याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.
सूरज झोरे हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आला होता. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी