
वॉशिंग्टन, 22 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी क्यूबावरील दबाव आणखी वाढवला आहे. दोन्ही नेत्यांनी क्यूबाला “अपयशी राष्ट्र” असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, क्यूबा आता अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका बनला आहे. फ्लोरिडा आणि व्हाइट हाऊसमधून स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनांमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांनी क्यूबाबाबत आणखी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. मात्र, संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिका क्यूबातील नागरिकांना तसेच तेथून अमेरिकेत स्थायिक झालेल्या क्यूबन लोकांना मदत करू इच्छिते. क्यूबाच्या बिकट परिस्थितीचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले की, “ते एक अपयशी राष्ट्र आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे.” त्यांनी सांगितले की, तेथे वीज नाही, लोकांकडे पैसा नाही आणि अन्नधान्याचीही मोठी टंचाई आहे.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, मानवतेच्या दृष्टिकोनातून ते क्यूबाला मदत करू इच्छितात. फ्लोरिडामध्ये राहणारे क्यूबा वंशाचे अमेरिकन नागरिक आपल्या मूळ देशात गुंतवणूक करू इच्छित असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना आपला देश पुन्हा सक्षम आणि स्वावलंबी व्हावा, अशी इच्छा आहे. मागील ५० ते ६० वर्षांपासून अनेक राष्ट्राध्यक्ष या प्रश्नावर विचार करत होते, मात्र ही समस्या आपणच सोडवू शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला.
दरम्यान, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मियामी विमानतळावर अधिक कठोर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, क्यूबा सातत्याने अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका ठरत आहे. क्यूबा अमेरिकेच्या किनाऱ्यापासून अवघ्या ९० मैलांवर असल्याची आठवण करून देत रुबियो म्हणाले की, तेथे अशी सत्ता आहे जी अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांच्या मित्रांकडून चालवली जाते.रुबियो यांनी दावा केला की, क्यूबामध्ये रशिया आणि चीनच्या गुप्तचर संस्था सक्रिय आहेत. तसेच या दोन्ही देशांची शस्त्र प्रणालीही तेथे पोहोचली आहे. त्यांनी क्यूबावर लॅटिन अमेरिकेत अस्थिरता निर्माण करण्याचा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचाही आरोप केला.
व्हाइट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनीही या चिंतांची पुनरावृत्ती केली. त्यांनी इशारा दिला की, क्यूबा अमेरिकेच्या शत्रूंसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू शकतो. मिलर म्हणाले की, अमेरिकेचा कोणताही शत्रू क्यूबामधून ड्रोन हल्ले करू शकतो आणि हे ड्रोन अतिशय सहजपणे अमेरिकन सीमांपर्यंत पोहोचू शकतात. अमेरिकेच्या इतक्या जवळ शत्रू किंवा दहशतवादी तळ सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.रुबियो यांनी शेवटी सांगितले की, अमेरिका मानवतावादी मदत देण्यास तयार आहे. मात्र, ही मदत क्यूबाच्या लष्कराऐवजी केवळ स्वतंत्र गटांच्या माध्यमातूनच दिली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode