
तेहरान , 22 मे (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात एका मोठ्या करारासंदर्भात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देश एकमेकांना संदेश आणि लेखी प्रस्ताव पाठवत आहेत. तर एका अहवालात इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, दोन्ही बाजू कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्या आहेत. मात्र, अंतिम करार झाला आहे असे आताच ठामपणे सांगणे घाईचे ठरेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अहवालात असेही म्हटले आहे की, मोहसिन नकवी इराण दौऱ्यावर आहेत. तेथे ते होर्मुज सामुद्रधुनीतील परिस्थितीवर चर्चा करत आहेत. तथापि, अंतिम करार नेमका कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे जाणकारांचे मत आहे. ही चर्चा अशा वेळी सुरू आहे, जेव्हा अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.
एका अहवालानुसार, इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने आपल्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. इस्रायलच्या बचावासाठी अमेरिकेने २०० हून अधिक ‘थाड’ इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय, समुद्रात तैनात युद्धनौकांमधून १०० हून अधिक ‘स्टँडर्ड मिसाइल-३’ आणि ‘स्टँडर्ड मिसाइल-६’ डागण्यात आल्या. त्यामुळे पेंटागॉनकडे असलेल्या एकूण साठ्यापैकी जवळपास निम्मा साठा संपल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इस्रायलने स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेपेक्षा कमी क्षेपणास्त्रांचा वापर केला. इस्रायलने केवळ १०० ‘अॅरो’ आणि सुमारे ९० ‘डेव्हिड्स स्लिंग’ इंटरसेप्टर वापरले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शस्त्रटंचाईमुळे जागतिक सुरक्षेबाबत अमेरिकेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याचदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, इराणला संवर्धित युरेनियम ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हे युरेनियम आपल्या ताब्यात घेऊन नष्ट करेल. त्यांनी असा दावाही केला की, इराणसोबतचा वाद लवकरच संपुष्टात येईल. ट्रम्प यांच्या मते, हा वाद संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode