
नवी दिल्ली , 22 मे (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताला उत्कृष्ट भागीदार असल्याचे म्हटले आणि भारताला जितके इंधन खरेदी करायचे असेल तितके अमेरिका विकण्यास तयार असल्याचे सांगितले. आपल्या पहिल्या भारत दौऱ्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हा दौरा महत्त्वाचा आहे कारण यामुळे त्यांना क्वाड देशांच्या मंत्र्यांची भेट घेण्याची संधी मिळणार आहे. रुबियो 23 ते 26 मे दरम्यान भारतात राहणार असून कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीचा दौरा करणार आहेत.
रुबियो यांनी सांगितले, “भारत हा आमचा सर्वोत्तम सहकारी आणि भागीदार आहे. आम्ही त्यांच्यासोबत अतिशय चांगले काम करत आहोत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा आहे. आमच्याकडे चर्चेसाठी अनेक विषय असतील. आम्ही तिथे क्वाड देशांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर्षाच्या अखेरीस आणखी एक क्वाड बैठकही होणार आहे.”ते म्हणाले की, व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्ज या देखील पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात नवी दिल्लीसोबत अनेक क्षेत्रांत सहकार्याच्या संधी उपलब्ध होतील.
रुबियो यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा अमेरिकन रिफायनरींमध्ये व्हेनेझुएलाच्या जड कच्च्या तेलाच्या (हेवी क्रूड ऑइल) आयातीत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की अमेरिकेला व्हेनेझुएलाकडून ८० दशलक्ष बॅरलपेक्षा अधिक तेल मिळाले आहे.
रुबियो यांनी असेही जाहीर केले की, व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्ज या पुढील आठवड्यात तेल विक्रीबाबत चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत. ते म्हणाले,“व्हेनेझुएलाच्या तेलाबाबतही अनेक संधी उपलब्ध आहेत, असे आम्हाला वाटते. माझ्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षा पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.”
इराणच्या मुद्द्यावर बोलताना रुबियो यांनी स्पष्ट केले की, रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्याचा किंवा त्या मार्गावरील प्रवेशातून आर्थिक फायदा कमावण्याचा इराण चा कोणताही प्रयत्न अमेरिका सहन करणार नाही.हा इशारा अशा अहवालांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे, ज्यामध्ये इराण होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी ओमानसोबत कायमस्वरूपी टोल व्यवस्था लागू करण्याबाबत चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. रुबियो यांनी या पावलाला जागतिक व्यापार आणि समुद्री वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी थेट धोका असल्याचे म्हटले.
भारत आपल्या ऊर्जा गरजांपैकी जवळपास निम्मा भाग आणि बहुतांश तेल आयातीवर अवलंबून आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम आता संपूर्ण जगभर जाणवत आहे. यामुळे डिझेल, पेट्रोल आणि एलएनजीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी चार दिवसांत दोनदा इंधन दरवाढ केली. प्रथम ३ रुपयांनी आणि त्यानंतर ९० पैशांनी इंधनाच्या किमती वाढवण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode