
- सहकारी मृत झाल्यानंतर टोल कर्मचार्यांनी रास्ता रोको
धुळे, 25 मे (हिं.स.) - मुंबई-आग्रा महामार्गावर आज पहाटे भीषण आणि विचित्र अपघात झाला. चुकीच्या दिशेने येणारा वाळूचा डंपर समोरुन येणार्या दारु वाहतुक करणार्या ट्रकवर आदळला. या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी धावलेल्यांवर देखील काळ बनून लक्झरी आली. मुंबईहुन इंदौरच्या दिशेने जाणारी लक्झरी अपघातग्रस्त वाहनांवर आदळली. त्यामुळे डंपर आणि ट्रकच्या मध्ये उभे राहुन मदत करणारा टोल कर्मचारी आणि अन्य एका डंपर चालकाला आपला जीव गमवावा लागला. या भीषण अपघातात ६ जण ठार झाले तर २६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदतीसाठी धावलेला आपला सहकारी अपघातात मृत झाल्यानंतर टोल कर्मचार्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर ट्रफिक जाम झाला होता. अपघातातील जखमींना उपचारासाठी सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
अपघाताचे वृत्त कळताच पोलिस अधिक्षक विशाल आनंद सिंगुरी,डीवायएसपी राजकुमार उपासे, मोहाडी पोलिस ठाण्याच्या पीआय शिल्पा पाटील, चाळीसगावरोड पोलिस ठाण्याचे पीआय सुरेशकुमार घुसर , महामार्ग पोलिस आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. महामार्ग पोलिसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केलेत. मोहाडी पोलीस आणि लळींग टोल नाक्याच्या कर्मचार्यांच्या मदतीने जखमी व मृतांना रुग्णालयात हलविण्यात आले. मदतीसाठी धावलेल्या काही टोल कर्मचार्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ टोल कर्मचार्यांनी नंतर महामार्ग रोखून धरला, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मृतांमध्ये लक्झरी बस चालक जावेद खान (४३, रा. बडवानी, मध्य प्रदेश), मनोज नरवाळ (३२, रा. टोकरे, मालेगाव), तसेच टोल कर्मचारी गणेश हिरामण थोरात (३५, रा. हटकरवाडी, चितोड रोड, धुळे),अमिर सगीर कुरेशी (वय २९), समिर कुरेशी (वय ३२) दोघे रा.आनंदबेडी पिंप्री जि.बडवाणी, डंपर चालक योगेश पंडीत मंडलीक (वय ३४) रा.सोयगांव ता.मालेगाव यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सुरभी महाजन (३२), शिवाय महाजन (९), दीपक वालके (२६), सपना महाजन (४०), अनीता वालके (४५), विजय सिंह (५०), तबरीश अन्सारी (४५), सपना दिवाण (३५), इमरान खान (३५), भावना हटकर (२८), हुसेना (३२), सामिन सैयद (४५), शकीला सैयद (५०), सैयद अयुब (४५), शैलेश आक्या (२२), जेबान अली (५८), मुस्कान खान (२२), अनिल वर्मा (५३), अरविंद जैन (४७), अजय कुमार (२६), सईद मोहम्मद (३१), अंकित राजपूत (२४), अभिजीत आपटे (२५), कनक सोनी (१९) आणि संगीता सोनी (४७) यांचा समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत. टोल कर्मचार्यांच्या रास्तारोकोची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा करीत त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकांनी घटनेचे गंभीरता पाहुन सहकार्य करावे, अशी विनंती केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, मोहाडीच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सुरेशकुमार घुसर आदी उपस्थित होते.
एकुलत्या एक गणेशच्या मृत्यूने कुटूंबावर आभाळ कोसळले
लळींग टोलनाक्यावर कर्तव्याला असलेला गणेश थोरात हा मिल परिसरातील चितोड रोडवरील हटकरवाडीतील रहिवासी होता.त्याचे वडिल हिरामण थोरात हे देखील टोल नाक्यावर कामाला होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटूंबाची जबाबदारी गणेशवर होती. गणेश हा लळींग टोल नाक्यावर कामाला लागला. विधवा आई, पत्नी आणि दोन मुलांचा परिवार पूर्णपणे गणेशवर अवलंबुन होता. मदतीसाठी सदैव तत्पर आणि धावुन जाणारा तरुण अशी गणेशची मिल परिसरात, हटकरवाडीमध्ये ओळख होती. आज पहाटे देखील दोन वाहनांच्या अपघातानंतर मदतीसाठी सर्वप्रथम टोल नाक्यावरुन गणेशच धावला. मात्र भरधाव ल३झरी काळ बनुन आली. ट्रक आणि डंपरच्या मध्ये असलेल्या जागेत टॅमीच्या मदतीने अपघातात अडकलेल्या काढत असताना लक्झरी अपघातग्रस्त डंपरवर आदळली. त्यामुळे डंपर आणि ट्रक मध्ये मदतीसाठी असलेल्या गणेशच्या शरीरात टॅमी घुसली आणि तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मृत्यूची खबर मिल परिसरात धडकताच लोकप्रतिनिधींसह समाज बांधव, नातलग, परिसरातील तरुणांनी अपघातस्थळी धाव घेतली. हटकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर