

नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजधानी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष नागरी सन्मान समारंभात धर्मेंद्र यांच्या वतीने त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी त्यांची कन्या अहाना देओल देखील उपस्थित होती. धर्मेंद्र यांच्या मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा होताच सभागृहातील वातावरण भावनिक झाले आणि हेमा मालिनी तसेच अहाना देओल यांना अश्रू अनावर झाले.
सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. ‘शोले’, ‘चरस’, ‘मेरा गांव मेरा देश’ आणि ‘अपने’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयातील सहजता, दमदार व्यक्तिमत्त्व आणि भावनिक भूमिका यांमुळे ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानले जात होते. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
सोमवारी झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात हेमा मालिनी जेव्हा मंचावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानासोबतच पतीच्या आठवणींची भावनिक छटा स्पष्ट दिसून आली. सभागृहात बसलेल्या अहाना देओल यांनाही अश्रू आवरता आले नाहीत. या क्षणाचे छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून चाहत्यांकडून त्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केंद्रीय प्रसार माध्यम विभागानेही या सोहळ्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे.
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, पद्म पुरस्कार २०२६ सोहळ्यात चित्रपट, संगीत, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा केंद्र सरकारने २५ जानेवारी रोजी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule