
पुणे, 25 मे (हिं.स.)। बुधवार पेठ येथील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदा वास्तव्यासंदर्भात या महिलांविरोधातफरासखाना पाेलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेस कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून शहरात विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बुधवार परिसरातील वेश्यावस्तीत काही बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सागर बिल्डिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्या बेकायदा वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, चौकशीत दलालांनी महिलांना भारतात ब्युटी पार्लर, शिवणकाम तसेच घरकाम मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना धमकावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या महिलांनी भारतीय सीमा कशी ओलांडली, तसेच बेकायदा वास्तव्य करताना आवश्यक कागदपत्रे कशी मिळवली, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु