
रभणी, 26 मे (हिं.स.) : तालुक्यातील सावंगी खुर्द व बोबडे टाकळी येथे सोमवारी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (26 मे) घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
या वादळात शेतातील पॉलिहाऊस, फळबागा, जनावरांचा चारा, गोठे व शेड, सोलर पंप तसेच विद्युत पोल यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच डिझेल-पेट्रोल टंचाई, खत-बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि शेतीतील आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती अधिक बिकट झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बाधित भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
तसेच महावितरणच्या विद्युत पोलचे मोठे नुकसान झाल्याने वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. “आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा विश्वास आमदार राहुल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या पाहणीदरम्यान शिवसेना विधानसभा प्रमुख डॉ. दिनेश बोबडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष उत्तम मुळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनिल पंढरकर यांच्यासह विविध पदाधिकारी, महसूल व महावितरणचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis