
मुंबई, 26 मे (हिं.स.) : विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये मुंबईत सलग बैठकांचे सत्र सुरू असूनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तणाव आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतरही जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घडामोडींमुळे हा वाद आता राज्यातून थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुमारे 20 मिनिटांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी जागावाटपाबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले.“कुठलं बोलणार… काय आहे?” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीत सर्वकाही सुरळीत नसल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
या निवडणुकीत 17 जागांवर महायुतीमध्ये स्पष्ट मतभेद दिसत आहेत. शिंदे गटाचा 7 जागांवर ठाम दावा असून भाजपचा सध्याचा फॉर्म्युला: 12 जागा भाजप, 3 शिंदे गट, 2 राष्ट्रवादी असा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) काही जागांवर विशेषतः रायगडवर आग्रही असून ठाणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप लातूर, नागपूर, पुणे, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर यांसारख्या प्रमुख जागांवर दावा करत आहे.तर शिंदे गट ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि काही कोकण पट्ट्यातील जागांवर आग्रह धरत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस परभणी, हिंगोली आणि रायगडसारख्या जागांवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या जागावाटपातील तणाव हा केवळ संख्येचा नाही तर स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, या जागावाटपातील तणाव हा केवळ संख्येचा नाही तर स्थानिक पातळीवरील ताकद आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा आहे. त्यामुळे कोणतीही बाजू सहज माघार घेण्यास तयार नाही.जर मुंबईतील चर्चा निष्फळ ठरली, तर अंतिम निर्णय दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता फडणवीस–शिंदे–शाह भेटीकडे लागले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी