
बीड, 03 मे (हिं.स.)।केज तालुक्यातील विडा येथे विनापरवाना पेट्रोल आणि डिझेलची बेकायदेशीर साठवणूक करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका इसमावर केज पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या या अवैध धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात इंधन जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही परवान्याशिवाय ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना विडा गावातील 'दुकानामध्ये अवैध इंधन साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह दुकानावर अचानक छापा टाकला असता तेथे प्लास्टिकच्या कॅनमध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घराच्या पाठीमागील बाजूस निळ्या रंगाच्या कॅनमध्ये लपवून ठेवलेला डिझेलचा साठा हस्तगत केला.
या कारवाईत एकूण १८ हजार ४५० रुपये किमतीचे १९८ लिटर डिझेल आणि ३ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, अंमलदार संतोष गित्ते, शिवाजी कागदे, शहादेव म्हेत्रे आणि नितीन जाधव यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis