
अमरावती, 04 मे (हिं.स.) : नांदगावपेठ हद्दीतील टाकळी जहाँगीर परिसरात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका युवकावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश प्रकाश सोनवणे (वय 28, रा. टाकळी जहाँगीर) हा मित्राच्या लग्नाच्या वरातीत सहभागी झाला होता. रात्री वरातीत नाचण्यावरून काही व्यक्तींमध्ये वाद झाला होता. मात्र आकाश सोनवणे यांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता.
त्यानंतर मध्यरात्री आकाश मित्रासह गावातील विहाराजवळ असताना सात ते आठ जणांचा संशयित गट तेथे आला. या गटातील काही जणांकडे चाकू, रॉड आणि दगड होते. त्यानंतर अचानक झालेल्या हल्ल्यात मोहीत गवई, अमर रामरतन सोनवणे आणि सुमित धुंदळे यांच्यावर चाकू व रॉडने वार करण्यात आले, तर प्रतीक प्रमोद कांबळे याला दगडफेकीत दुखापत झाली.
या प्रकरणी रविवारी (ता. 3) नांदगावपेठ पोलीस ठाण्यात आकाश सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यश रमेश लिंगोट, सार्थक वासुदेव मोरे, राम दिलीप काळपांडे, भूषण मोरे, पंकज जयराम पांडे, सूरज दाभणे, धीरज दाभणे आणि ओम काळपांडे (सर्व रा. टाकळी जहाँगीर) यांना अटक केली आहे.
या घटनेबाबत नांदगावपेठचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी सांगितले की, “वरातीत नाचण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे.”या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी