पनवेलमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खूनाचा संशय
रायगड, 04 मे (हिं.स.) : पनवेल तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंध
Atmosphere of fear in Bombay Pada area; Mystery of woman's death remains


रायगड, 04 मे (हिं.स.) : पनवेल तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांमुळे गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

सूचना मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणामागे वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारण की अन्य कोणता गुन्हेगारी हेतू आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

या घटनेमुळे बंबई पाडा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande