
अमरावती, 04 मे (हिं.स.) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीने पॅरोल रजा मिळवण्यासाठी वडिलांच्या आजाराचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात संबंधित बंदीविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील अजाबराव खरपे (वय 39, रा. रुक्मिणीनगर, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षाधीन बंदीचे नाव आहे. कारागृहातील कर्मचारी दीपक रमेश टोणपे (वय 45) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये स्वप्नील खरपे याने वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी नियमित पॅरोल रजा मिळावी म्हणून अर्ज सादर केला होता. या अर्जासोबत त्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिलेले असल्याचे भासवणारे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले होते.
मात्र कारागृह प्रशासनाला या प्रमाणपत्राबाबत संशय आल्याने ते पडताळणीसाठी संबंधित रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तपासणीदरम्यान इर्विन रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालात हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बंदीने फसवणुकीच्या उद्देशाने खोटे कागदपत्र सादर केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही कारागृहात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या वेळी 15 बंदींनी पॅरोलसाठी सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले होते आणि त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी