
सोलापूर, 04 मे (हिं.स.) : सोलापूर रोटरी परिवारासाठी नुकताच एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला असून, Rotary Internationalच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ आणि ‘रोटरी DiGi क्लासरूम’ या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ ही फिरती आरोग्यसेवा आता गावोगावी पोहोचणार आहे. या माध्यमातून महिलांची मोफत कॅन्सर तपासणी, तसेच आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना वेळेवर निदान, उपचार आणि मार्गदर्शन मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
दुसरीकडे, ‘रोटरी DiGi क्लासरूम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचे नवे दालन खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत ७०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, चालू वर्षात १,००,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हे दोन्ही प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि स्थानिक रोटरी क्लब्सच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहेत. “Service Above Self” या Rotary Internationalच्या ब्रीदवाक्यानुसार, सेवा, संकल्प आणि प्रभाव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम समाज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व होस्ट क्लब्स, भागीदार संस्था आणि रोटरी परिवारावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड