ढोरसांगवी गावात सीसीटीव्ही कॅमेरे; सुरक्षिततेसाठी ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर
लातूर, 04 मे (हिं.स.) :जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावाचे सरपंच सोक्शा दिलीप सोनकांबळे आणि ग्रामपंचायत अधिकारी केशव शेवटे यांच्या पुढाकारातून संपूर्ण ग
सीसीटीव्ही


लातूर, 04 मे (हिं.स.) :जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावाचे सरपंच सोक्शा दिलीप सोनकांबळे आणि ग्रामपंचायत अधिकारी केशव शेवटे यांच्या पुढाकारातून संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत सोनकांबळे यांना सरपंचपदाची संधी दिली होती. त्यांनी रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच काहीतरी वेगळे आणि उपयुक्त करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याचाच एक भाग म्हणून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक आणि अण्णाभाऊ साठे चौक या प्रमुख ठिकाणी एकूण तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गावातील घडामोडींवर थेट नजर ठेवता येत असून ग्रामपंचायत कार्यालयात बसून लाईव्ह प्रक्षेपण पाहता येते.

या उपक्रमासाठी ग्रामसेवक केशव शेवटे, उपसरपंच परमेश्वर पोतणे, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. गावाच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या पावलाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

या उपक्रमामुळे गावात शिस्त, सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande