
लातूर, 04 मे (हिं.स.) : नगरपंचायतीतील वादग्रस्त ठरलेल्या अतिरिक्त अभियंत्यांचा अखेर पदभार काढण्यात आला असून काँग्रेस नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या उपोषणाला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात आहे.
संबंधित अभियंत्यांच्या कार्यपद्धतीविरोधात विविध पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत आवाज उठवला होता. भाजपा नगरसेवक उमाकांत देवंगरे, सौ. सुषमा मठपती, काँग्रेसचे सुधीर लखनगावे, राष्ट्रवादीचे संतोष शिवणे, सभापती सौ. श्रीदेवी संभाळे, पार्वतीबाई देवंगरे तसेच शिवसेना (उबाठा) नगरसेविका सौ. रागिणी शिवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत पदभार काढण्याची मागणी केली होती.
गेल्या चार वर्षांपासून संबंधित अभियंत्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत होती. विकासकामांतील विलंब आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. याविरोधात सुधीर लखनगावे यांनी उपोषण सुरू केल्याने नगरपंचायत प्रशासनावर दबाव वाढला.
उपोषणादरम्यान रोहित पवार, डॉ. शिवाजी काळगे आणि अशोकराव पाटील निलंगेकर यांनी हस्तक्षेप करत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित अभियंत्यांचा पदभार काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान, शहरातील प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करावीत आणि प्रशासनाने नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी सुधीर लखनगावे यांनी केली आहे. नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाने यापुढे अधिक जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis