
लातूर, 04 मे (हिं.स.) : औसा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला.
कारला तांडा, कुमठा तांडा, रामवाडी, शिवणीलख वाडी, हालसी ते हंद्राळ, हत्तरगा, धानोराझ–यलमवाडी, औसा ते आलमला, सारोळा ते खुटेगाव, सारणी पूर्व ते जुने सारणी, भुसणी–झधानोरा तसेच मसलगा ते माळकोंडजी या महत्त्वाच्या जोडरस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
सदर रस्त्यांची कामे पूरहानी कार्यक्रम आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना निधी अंतर्गत प्रस्तावित असून, त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
याशिवाय, औसा मतदारसंघातील मौजे फत्तेपूरसह विविध गावांमध्ये नवीन इमारती बांधकामासाठी मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच देवताळा येथील देवी मंदिर, महादेववाडी येथील महादेव मंदिर, मातोळा येथील खंडोबा मंदिर आणि इतर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देऊन आवश्यक सुविधा व निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis