
लातूर, 04 मे (हिं.स.)।
: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार, ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट (कलम १३८) अंतर्गत धनादेश अनादर प्रकरणे, भूसंपादन, कौटुंबिक वाद आणि मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे व कामगार/औद्योगिक न्यायालयातील प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तसेच बँक तथा वित्तीय संस्थांची वाद पूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.लोकअदालतीमध्ये दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची समान संधी मिळते. आपापसातील संमतीने तडजोड होत असल्याने दोन्ही पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रकरण आपापसातील संमतीने निकाली निघाल्यास भरलेले न्यायालयीन शुल्क परत मिळते. या लोकअदालतीमध्ये पक्षकार आणि विधीज्ञांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. एन. गिरवलकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis