पीएसएल 2026: पेशावर जाल्मीने दुसऱ्यांदा पटकावले पीएसएलचे विजेतेपद
इस्लामाबाद , 04 मे (हिं.स.)। तब्बल 9 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पेशावर जाल्मीने पुन्हा एकदा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) 2026चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जाल्मीने हैदराबाद किंग्समेनचा पाच विकेट्सनी पराभव करत दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आणि आ
पीएसएल 2026: पेशावर जाल्मीने दुसऱ्यांदा पटकावले पीएसएलचे विजेतेपद


इस्लामाबाद , 04 मे (हिं.स.)। तब्बल 9 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पेशावर जाल्मीने पुन्हा एकदा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) 2026चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जाल्मीने हैदराबाद किंग्समेनचा पाच विकेट्सनी पराभव करत दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आणि आपल्या चाहत्यांना अविस्मरणीय विजयाची भेट दिली. यापूर्वी संघाने 2017 मध्ये विजेतेपद मिळवले होते, त्यानंतर सतत प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नव्हते. यावेळी मात्र संपूर्ण स्पर्धेत संतुलित कामगिरी करत त्यांनी अंतिम सामन्यातही आपले वर्चस्व राखले.

जाल्मीचा कर्णधार बाबर आझम याच्यासाठी हा विजय विशेष मानला जात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथमच मोठे विजेतेपद जिंकले. जरी अंतिम सामन्यात बाबर शून्यावर बाद झाला, तरी संपूर्ण हंगामात त्याने संघाला स्थिर ठेवत महत्त्वाच्या क्षणी जबाबदारी पार पाडली.अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद किंग्समेनची सुरुवात खराब झाली आणि संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. सतत विकेट्स पडत राहिल्याने मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही आणि संघ 18 षटकांत 129 धावांवर आउट झाली. सईम अयूबने एका टोकाला 54 धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, तर कर्णधार मार्नस लाबुशेनने 20 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र प्रभाव टाकू शकले नाहीत.

या सामन्यात आरोन हार्डीने शानदार अष्टपैलू कामगिरी करत सामन्याचा कल बदलला. त्याने प्रथम गोलंदाजीत चार विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे किंग्समेनच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. त्याला नाहिद राणानेही दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जाल्मीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात मोहम्मद हारिस आणि बाबर आझम या दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. सुरुवातीच्या धक्क्यानंतर संघाची अवस्था 4 बाद 40 अशी झाली होती आणि सामना किंग्समेनच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत होते.

यानंतर आरोन हार्डी आणि अब्दुल समद यांनी संयम आणि आक्रमकतेचा उत्तम समतोल साधत सामना पलटवला. दोघांमध्ये 85 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली, ज्यामुळे संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. समदने 34 चेंडूत 48 धावांची वेगवान खेळी केली, तर हार्डीने नाबाद 56 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटी पेशावर जाल्मीने 5 विकेट्स गमावत 28 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. या विजयासह संघाने नऊ वर्षांनंतर पुन्हा पीएसएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आणि चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. यापूर्वी 2017 मध्ये डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली त्यांनी पहिले विजेतेपद मिळवले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande