
सोलापूर, 04 मे (हिं.स.) : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दि. २४ ते २८ एप्रिलदरम्यान पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. या विजयी संघात सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केगाव (सोलापूर) येथील तब्बल ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
स्पर्धेसाठी भारतीय संघ चेन्नई येथून विमानाने श्रीलंकेला रवाना झाला होता. स्पर्धेत सब-ज्युनियर बॉईज, सब-ज्युनियर गर्ल्स, यूथ बॉईज आणि यूथ गर्ल्स या सर्व गटांमध्ये भारताने अपराजित कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. प्रत्येक गटात भारताने लीग फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत शानदार विजय नोंदवले. सब-ज्युनियर बॉईज गटात भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर २३-१८ असा विजय मिळवला, तर सब-ज्युनियर गर्ल्स गटात १९-१६ अशी मात केली. यूथ बॉईज गटात ३६-२७ आणि यूथ गर्ल्स गटात २३-१९ अशा विजयांसह भारताने सर्वच गटांमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत सिंहगड संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन केले. सब-ज्युनियर गर्ल्स गटात कु. जानवी बुराडे, यूथ गर्ल्स गटात कु. श्रद्धा चव्हाण व कु. आर्या पाटणे, सब-ज्युनियर बॉईज गटात आदित्य गुंड, आशिष बनसोडे व समर्थ मगर, तसेच यूथ बॉईज गटात अथर्व गुर्रम व वरुण सरडा यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड