
पुणे, 04 मे (हिं.स.)। : नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतरही संयम राखत साध्या पद्धतीने आनंद व्यक्त करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरीसह इतर राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. देशभरात अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असताना पुण्यात मात्र वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही उत्सव किंवा जल्लोष साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पुणे शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याऐवजी पुण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ‘भारत माता पूजन’ करून तसेच एकमेकांना शुभेच्छा देत साध्या पद्धतीने विजयाचा आनंद व्यक्त केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा फटाक्यांचा आवाज, मिरवणुका किंवा मोठ्या प्रमाणावर जल्लोष टाळण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सामाजिक भान राखत राजकीय उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु