
पुणे, 04 मे (हिं.स.) : पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालयात तब्बल सात महिन्यांनंतर मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, विविध विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “प्रश्न आणि समस्या मांडायच्या तरी कशा?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीनंतर निवडणुकांचे कारण देत प्रशासनाने सात महिने बैठक घेतली नव्हती. त्यामुळे कमिटी सदस्य आणि स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढत होता. अखेर 30 एप्रिल रोजी ही बैठक पार पडली, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
बैठकीत परिसरातील विविध समस्या मांडण्यात आल्या. येरवडा मासळी बाजार परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था हा प्रमुख मुद्दा ठरला. देखभालीसाठी नेमलेल्या केअरटेकरकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले असून तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली.
तसेच, येरवडा भाजी मार्केट परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी सलमा शेख यांनी केली. काही स्वच्छतागृह पाडून त्या जागेवर घरे उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप दिलीप कुराडे यांनी केला.
नागरिकांनी प्रशासनाने नियमित बैठका घेऊन समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु