
सोलापूर, 04 मे (हिं.स.) : सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा मोहोळ ते तांदूळवाडी (हैदराबाद–सोलापूर महामार्ग) बाह्यवळण मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात आंशिक मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत मोहोळ ते वळसंग या ८१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी सुमारे ७४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने एकूण १०७ किलोमीटर लांबीच्या या बायपासचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. हा महामार्ग मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघांतून जाणार आहे. उर्वरित मार्गासाठी दुसऱ्या टप्प्यात मंजुरी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे समजते. मात्र, या मंजुरीनंतर राजकीय वर्तुळात श्रेयवादाला सुरुवात झाली आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांनीही सामाजिक माध्यमांवरून मंजुरीबाबत माहिती देत आपले योगदान अधोरेखित केले आहे.
दरम्यान, या बायपास प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड