
जळगाव, 06 मे (हिं.स.) शहरात एकीकडे घरफोडीच्या घटना वाढतं असल्याचं दिसत असताना अशातच एअरपोर्ट जवळील तारा बिझनेस पार्क परिसरात घरात झालेली १२ लाख १३ हजार रुपयांची मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तारा बिझनेस पार्क भागात राहणारे ‘रूबी पेंट्स’ कंपनीचे मालक मोईज अब्बास बोहरा यांच्या कंपनीतील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला होता.चोरटयांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने गुन्हे शोध पथक (DB) तैनात केले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता, हे चोरटे मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
हा भाग अतिशय संवेदनशील आणि दुर्गम असल्याने आरोपींना पकडणे मोठे आव्हान होते. तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सेंधवा, चाचरीया पाटी आणि खरगोन परिसरात वेशांतर करून चोरांवर पाळत ठेवली. अखेर योग्य संधी साधून पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकत ५ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जळगावातील घरफोडीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्यामध्ये निलेश उर्फ भुऱ्या माहेरिया डुडवे, ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे आणि यारशीरालाल मगन अलावे यांचा समावेश आहे.पोलिसांनी यांच्या कडून ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (५,४७,५०० रुपये), ९९ ग्रॅम चांदीचे दागिने (२५,००० रुपये) आणि ५,७८,००० रुपये रोख असा एकूण ११,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर