भुसावळ नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफाराचा आरोप
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची पोलिसांत तक्रार जळगाव, 07 मे (हिं.स.) :भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करत थेट पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी भुसावळ शहर
भुसावळ नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफाराचा आरोप


नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची पोलिसांत तक्रार

जळगाव, 07 मे (हिं.स.) :भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगरपालिकेतील जुन्या नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करत थेट पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गायत्री भंगाळे यांचे आजोबा प्रेमनाथ कामता प्रसाद हे १९४९ साली रेल्वे सेवेत रुजू झाल्यानंतर भुसावळ येथे वास्तव्यास होते. त्यांच्या नावाची नोंद शिवाजीनगर परिसरातील नगरपालिका असेसमेंट रेकॉर्डमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. १९५० ते १९८४ या कालावधीतील काही दस्तऐवज जात वैधता पडताळणी प्रक्रियेसाठी वापरण्यात आले होते.

मात्र, या दस्तऐवजांमध्ये फेरफार झाल्याचे दक्षता समितीच्या पडताळणीत समोर आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करण्यामागे काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर भुसावळ शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande