लातूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा बुलडोझर
लातूर, 08 मे, (हिं.स.)। समाजातील शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल ता
पोलीस कारवाई


लातूर, 08 मे, (हिं.स.)। समाजातील शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्हाभर धडक कारवाया करण्यात आल्या. शहरी व ग्रामीण भागात एकाचवेळी नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी करून अवैध दारू विक्री, जुगार-मटका तसेच प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या २६३ व्यक्तींविरुद्ध २५७ गुन्हे दाखल करून १२ लाख ८१ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार-मटका प्रकरणात १२१ जणांवर कारवाई करून ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २९ लाख ८३ हजार ९६० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले.

तसेच प्रतिबंधित गुटखा व पानतंबाखूची अवैध वाहतूक, विक्री व साठवणूक करणाऱ्या २५ आरोपींविरुद्ध २१ गुन्हे दाखल करून ६६ लाख ८८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण एप्रिल महिन्यात ४०९ व्यक्तींविरुद्ध ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल १ कोटी ०९ लाख ५४ हजार ०९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याशिवाय धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या १७ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून विविध प्रकारची १७ शस्त्रे व एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

अवैध धंद्यातील आरोपी पुन्हा अशा कृत्यांमध्ये सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सांगितले की, “लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande