
तब्बल ५२ गुन्हे दाखल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 08 मे (हिं.स.)।नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेला वेग आला असून पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत 52 गुन्हे दाखल करून 63 इसमांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एकूण 25 लाख 78 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीविरोधात 2 गुन्हे दाखल करून 9 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच मटका जुगार खेळणारे व चालविणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून 26 इसमांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 2 लाख 66 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवैध दारू विक्री करणाऱ्या 26 आरोपींविरुद्ध 25 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत 4, कोटपा कायद्यांतर्गत 3 तसेच इतर विविध कायद्यांन्वये कारवाया करण्यात येऊन एकूण 52 कारवाया करण्यात आल्या.
या संयुक्त मोहिमेत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी नागरिकांनी थेट पोलिसांना माहिती देता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत 'खबर' हेल्पलाइन (9150100100) सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती फोन किंवा व्हॉट्सऍपद्वारे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांचा हेल्पलाइनवर वाढता विश्वास पाहता अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिमेला मोठी मदत होत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis