
दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांना यश
अकोला, 07 मे (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून जंगलात फरार झालेल्या आरोपीला तब्बल दोन दिवसांच्या मोठ्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईसाठी १०५ पोलिसांची पाच पथके, स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी पथके तसेच चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी चान्नी पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादी आणि तिचे पती मजुरीसाठी बाहेर गेले असताना घरी एकटी असलेल्या १० वर्षीय मुलीवर आरोपी जगराम गोविंदा आडे (६०, रा. सावरगाव, ता. पातूर, जि. अकोला) याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अवित चांडक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक शंकर शेलके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
आरोपी जंगल परिसरात लपून बसल्यामुळे शोधमोहीम अधिक आव्हानात्मक ठरली. त्याच्याकडे मोबाईल किंवा वाहन नसल्याने कोणताही तांत्रिक मागोवा उपलब्ध नव्हता. त्यामुळे सावरगाव परिसरातील २० ते २५ किलोमीटरच्या घनदाट जंगलात पोलिसांनी पायी शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली, तसेच वन विभागानेही सहकार्य केले.
अखेर ७ जुलै रोजी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला जंगल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईवर काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. आरोपी जंगलात लपून बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली होती, अशी चर्चा असताना पोलिसांकडे ही माहिती आधीपासून होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर चर्चेला उधाण आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे